बाभूळगाव येथील मातोश्री दराडे आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
येवला,ता. ४ : आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने बाभूळगाव येथील मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने तालुक्यातील प्रमुख गावात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.या अंतर्गत ३०० वर रुग्णांनी तपासणी करण्यात आली तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि आयुष संचालनालय यांच्या निर्देशानुसार मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालयातर्फे परिसरात आयुर्वेदाचा प्रसार व्हावा या उद्देशाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये अंदरसुल, भारम, कोटमगाव, नगरसुल या ठिकाणी आरोग्य शिबिरांतर्गत मोफत निदान व औषधोपचार रुग्णांना देण्यात आले. विद्यार्थ्यांना आयुर्वेदाबद्द्ल आवड उत्पन्न व्हावी या उद्देशाने महाविद्यालयात व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.अवयवदान काळाची गरज या विषयावर डॉ. अशोक गावित्रे यांनी विद्यार्थ्यांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच डॉ. हितेश चौधरी,डॉ. ज्ञानेश्वर मिटके यांनी आयुर्वेद हा प्राचीन तसेच शाश्वत शास्त्र असुन पुढे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य असणार हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तसेच महाविद्यालयात द्रव्यगुण विभागांतर्गत औषधीवनस्पती प्रदर्शन, रसशास्त्र विभागांतर्गत आयुर्वेदातील विविध कृतान्न कल्पना, स्वस्थवृत्त विभागांतर्गत योगसाधना संहिता विभागांतर्गत संहिता पारायण असे उपक्रम यावेळी राबविण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पाटील,उपप्राचार्या डॉ. वर्षाराणी पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. आयुर्वेदाचा प्रचार व्हावा यासाठी गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम समन्वयक डॉ. बाबासाहेब शिंदे, डॉ. किरण पवार ,डॉ. दिपाली भालेराव आदींनी परिश्रम घेतले.